बायोस्कोप: चार दिग्दर्शक, चार कवी

अनेक जागांवर घडणाऱ्या घटनांचं विविधांगाने अनुभवकथन होत असतं आणि या एकमेकांपासून अलग असणाऱ्या घटनांना एका समीकरणात मांडायचं झालं तर ते असेल ‘बायोस्कोप’. चार दिग्दर्शक, चार कवी यांनी सादर केलेल्या या एका चित्रपटात वेगवेगळ्या चार गोष्टी जरी असल्या त्या सगळ्यांचं मूळ मात्र एकच आहे, असं जाणवतं.

‘दिल- ए- नादान’ या लघुपटामध्ये दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी एका वयस्कर स्त्रीच्या आयुष्यातली संध्याकाळ दाखवलेली आहे. संपूर्ण आयुष्य एक नावाजलेली गायिका म्हणून जगल्यानंतर निर्मलादेवी (नीना कुलकर्णी) आणि मियाजी (सुहास पळशीकर) भूतकाळाकडे वर्तमानात राहून कसे बघतात, त्यांच्या वर्तमानातले क्षण कश्या परिपक्वतेने ते बघतात याचं वर्णन या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं. मिर्झा गालिब यांच्या काव्यावर आधारित या लघुपटात पंख्याचा केलेला वापर खूप प्रतिकात्मकरित्या केलेला आढळतो. संतोष फुटाणे यांचं सूक्ष्म कलादिग्दर्शन आणि कृष्णा सोरेन यांच्या फ्रेम्स या लघुपटात खूप महत्वाच्या ठरतात. लघुपटात असलेले हिंदी मराठी यांचे मिश्रसंवाद कथेची परिपक्वता, आणि काव्यत्मकता वाढवण्यास साहाय्यभूत ठरतात. नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर यांचा समृद्ध अभिनय तसेच त्यांना लाभलेली वेशभूषा आणि नरेंद्र भिडे यांच्या संगीताची साथ लघुपटाची जमेची बाजू ठरते.

‘एक होता काऊ’ या सौमित्रच्या (किशोर कदम) काव्यावर आधारित आणि विजू माने दिग्दर्शित लघुपटात एक अबोल प्रेमकथा बघायला मिळते. कावळ्या (कुशल बद्रिके) आणि पाकळी (स्पृहा जोशी) यांच्यातली ही प्रेमगोष्ट कमी संवादात्मक जरी असली तर परिणामकारक आहे. वर्णभेदावर आधारित ही कथा व्यापक जरी नसली तरी सूचक मात्र नक्कीच आहे. लघुपटात सतत येणाऱ्या कावळ्याच्या फ्रेम्स खटकतात. रंगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या चित्रपटात आढळणारा गडद विरोधाभास एका ठराविक पातळीनंतर जास्तच भडक जाणवायला लागतो. जर मूळकथाच वर्णभेदावरील भाष्य असेल तर या अतिरिक्त विरोधाची खरंच गरज होती का, असा प्रश्न पडतो.

‘बैल’ या गिरीश मोहिते दिग्दर्शित लघुपटात पंजाब (मंगेश देसाई) या तरुण शेतकऱ्याचा संघर्ष कथन केलेला दिसतो. लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित या लघुपटाची मूळ कथा अभय देखणे यांनी लिहिलेली आहे. मूळ कथेत असणारं सामाजिक भान गिरीश मोहिते उत्तमरित्या दिग्दर्शित करतात. लघुपटात दाखवण्यात आलेला शहरी आणि खेड्यातला जीवनातला विरोध मूळ कथेला लाभलेली एक प्रतिकात्मक किनार आहे. एक सुशिक्षित शेतकरी जगण्यासाठी, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी हरेक प्रकारे संघर्ष करतो आणि अखेर आत्महत्येच्या गर्तेत स्वतःला ओढून घेतो. मंगेश देसाई या शेतकऱ्याच्या बायकोची भूमिका निभावली आहे ती स्मिता तांबे या अभिनेत्रीने; चित्रपटात जास्तीत जास्त वेळ न दिसणारी ती सतत जाणवणारी मात्र अशी आहे.

‘मित्रा’ या रवी जाधव दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर लिखित या कथेमध्ये समलैंगिकतेवर भाष्य केलेलं आहे. संदीप खरेंची कविता, तेंडुलकरांची कथा आणि रवी जाधवांची पटकथा – दिग्दर्शन अशा बहुपदरी लघुपटाची जमेची बाजू आहे – त्यात दाखवण्यात आलेला काळ. कृष्णधवल रंगांमध्ये असणारा हा लघुपट साधारणपणे १९४७ चा काळ रंगवताना दिसतो. सुमित्राला (वीणा जामकर) लहानपणापासूनचे आपल्या शरीरासोबतचे अनुभव त्याच्या मित्राला विनयला (संदीप खरे) जेव्हा सांगते तेव्हा त्याची येणारी प्रतिक्रिया इथे महत्त्वाची ठरते. सुमित्रावर प्रेम करणाऱ्या विनयला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा त्याला ते चुकीचं वाटतं पण तो ते तितक्या सहज समजूनही घेतो. वीणा जामकर यांचा परिपूर्ण अभिनय आणि त्याला लाभलेली उर्मीची (मृण्मयी देशपांडे) साथ कथेत महत्त्वाची ठरते. सिद्धार्थ तातूसकर यांचं कलादिग्दर्शन, मेघना जाधव यांची वेशभूषा आणि वासुदेव राणेंच्या फ्रेम्स या लघुपटात परिपुर्णपणे कामगाऱ्या बजावतात.

‘बायोस्कोप’ मध्ये जरी चार वेगवेगळ्या विषयावरच्या कथा असल्या तरी त्यांच्यातला मूळ दुवा आहे – कविता. या कवितांपेक्षाही मला असं वाटतं की या चारही चित्रपटात एक समान असा भाव आहे तो म्हणजे – स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. चारही लघुपटांचे निरनिराळे विषय पण या विविधांगी पदरांना एकत्र आणण्याचं काम चित्रपटात असणारा मूळ भाव करतो. सचिन कुंडलकरांच्या ‘गंध’ (२००९) प्रमाणे यात मानवी जीवनातल्या अवस्थांचं (कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक) स्पष्टतः वर्णन केलेलं नसलं तरी त्या अवस्थांमधलं समाजभान इथे कथन केलेलं आहे. ‘मित्रा’ मध्ये असणारी सुमित्राची स्वातंत्र्याची व्याख्या, ‘बैल’ मध्ये बंधुतेपासून वंचित ठरलेला पंजाब आणि ‘एक होता काऊ’मध्ये कावळ्याला समाजाकडून मिळत असणारी असमानतेची वागणूक यांमुळे ‘बायोस्कोप’ या तीनही मूल्यांचा चरित्रपट ठरतो, असं म्हणायला हरकत नाही.

लेखक: अमेय सरदेशमुख


बायोस्कोप नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: