ब्रिटिशकालीन भारत दाखवण्यात आलेल्या या चित्रपटात भूपती दत्त (शैलेन मुखर्जी) हा राजकारणात रस घेणारा, त्याचा अभ्यास असलेला आणि सोबतच स्वतःच्या वर्तमानपत्राच्या कामात व्यस्त असणारा चारुचा (माधबी मुखर्जी) नवरा तिच्यासाठी वेळ काढू शकत नसतो. याउलट, चारू ही कलाविषयांत रुची असणारी, साहित्य आणि संगीत यांची विशेष आवड असणारी अशी आहे. अमल (सौमित्र चॅटर्जी) हा भुपेनचा भाऊ जेव्हा त्यांच्या घरी येतो तेव्हा साहित्याची त्यांची रुची चारू आणि त्याच्यात एक अव्यक्त नातं तयार करून जाते. या नात्याचं एक द्वंद्व चालू होतं जे शेवटपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राहिलेलं असं दिसतं. चारू आणि अमलचं असं हे अव्यक्त नातं खरंतर प्रत्यक्षरीत्या आपल्याशी संवाद साधण्यात यशस्वी ठरतं. अश्या या घटनांना, कथानकाला उच्च मध्यमवर्गीय स्वरूपात दाखवण्यात, घरातल्या प्रत्येक वस्तूंना तेवढ्याच बारकाईपणाने हाताळण्यात कला दिग्दर्शक बन्सी चंद्रगुप्ता यांची मांडणी विशेष महत्वाची ठरते. कला दिग्दर्शकाच्या बारकाव्यांना आणि सहजवृत्ती दिग्दर्शकाच्या दृष्यमानास अचुकरित्या टिपण्यात सुब्रता मित्रा या सिनेमॅटोग्राफरच्या फ्रेम्स या जास्त परिणामकारक ठरतात.
चारुलता हा खरंतर चित्रपटापेक्षा व्यक्तिपट आहे. भावनांच्या सखोल प्रदेशावर सुरू असणारा हा एक खरंतर द्विधा मनोवस्थेचा आकार आहे. या द्विधा मनोवस्थेत होणाऱ्या अनंत हालचालींचं दृश्यमान खूप गुंतागुंतीचं नसून कथेतली स्पष्टता व्यक्त करणारं असं आहे. कथेतली ही स्पष्टता पटकथेत मात्र चारुच्या भावविश्वाचे अनेक कंगोरे आपल्यासमोर मांडण्यात यशस्वी ठरते.
चारुलतामध्ये जवळीक ही भावनांची आहे, अगतिकतेचा स्पर्शही नसलेल्या या चित्रपटात भावनिक मर्यादांचं भान जपलेलं आहे. चारुच्या या दुर्बिणीतून दिसणाऱ्या द्विधा मनोवृत्तींच्या दृष्यमानाला पाहताना एकटेपणाची ही झालर कश्या परिस्थितीत प्रत्येक नात्याला नेऊन उभं करते हे दिसतं. चित्रपटाच्या शेवटाला पूर्णविराम जरी नसला मिळाला तरी शेवटी जाणवणारी एक अस्वस्थ शांतता विस्तृत पसरलेल्या त्या सर्वांना एकप्रकारे साद घालून लुप्त होते आणि आपल्याला अनुत्तरित कोड्यात अडकवून जाते.
लेखक: अमेय सरदेशमुख
Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.
Leave a Reply