डोंबिवली फास्ट: ‘कॉमन मॅन’चा ‘अनकॉमन’ रस्ता

माणूस हा समाजशील जीव आहे. असं असलं तरी या समाजातल्या व्यवस्था, या समाजाचा विशिष्ट असा स्वभाव यांच्यावर कुठेतरी ठराविक घटनांमुळे आपण दैनंदिन जीवनात सहज प्रश्नचिन्ह उभं करीत असतो.एखाद्या राजकीय किंवा सामाजिक विचारधारा बद्दलच नाही तर समाजाच्या सुव्यवस्थेबद्दलही समाजातला सामान्य माणूस झगडताना किंवा अगदी मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन भाषेत बोलायचं झालं तर ‘अॅडजस्ट’ करताना, ‘स्ट्रगल’ करताना आपण पाहतो; अगदी आपण सर्वही तसंच करतो. डोंबिवली फास्ट (२००५) हा चित्रपट अश्याच कळपात असणाऱ्या पण नंतर कळपापासून अलग झालेल्या व्यक्तीचा सुव्यवस्थेसाठीचा झगडा आहे. निशिकांत कामत लिखित – दिग्दर्शित या चित्रपटात एक सामान्य माणसाने व्यवस्थेच्या नाकर्तेपणावर एक प्रश्नचिन्ह उभ केलं आहे.

डोंबिवली फास्ट हा सामान्य माणसाच्या बुद्धीने वेधलेला संघर्षपट आहे. चित्रपटाची एकूण विचारसरणी लक्षात घेता माधव आपटेंची (संदीप कुलकर्णी) प्रत्येक कृती ही तराजूच्या एका पारड्यासारखी एका बाजूला कललेली आपल्याला दिसते. याचं कारण असं की या संघर्षात त्या व्यवस्थेमुळे होणाऱ्या परिणामांना लक्ष्य केलेलं नसून व्यवस्थेच्या परिघात स्वतःच्या स्वार्थापायी माणूस कसा गुरफटला जातोय याचं चित्रण आहे. हा संघर्षपट म्हणजे ‘कॉमन मॅन’ साठीचा अन् ‘कॉमन’ माणसाने केलेला प्राप्त परिस्थिती बरोबरचा झगडा असावा असा आहे.माधव आपटे यांचा हा परिस्थिती सोबतचा संघर्ष अगदी घरातल्या मूलभूत गरजांपासून सुरू होताना आपल्याला दिसतो. डोंबिवली सारख्या भागात राहणारे आपटे मुलीच्या शाळेतल्या प्रवेशासाठी लागणाऱ्या ‘डोनेशन’ पासून ते अगदी ते बँकेतल्या चिरीमिरी पर्यंतच्या घटनांनी त्रस्त होतात. प्रामाणिकपणा रक्तात असणाऱ्या आपटे यांच्या हालचालींना हळूहळू हिंसक वळण मिळत जातं आणि कथानकाला निराळाच वेग प्राप्त होतो. माधव आपटेंच्या या ‘कॉमन मॅन’ सोबतच पोलीस इन्स्पेक्टर सुभाष अनासपुरे (संदेश जाधव) यांची भूमिकासुद्धा आपट्यांच्या संघर्षात महत्त्वाची कामगिरी बजावणारी आहे. मुंबईच्या वेगासोबत येऊ पाहणारे अमित पवार यांचे ‘फास्ट कट्स’ मुंबईतल्या जनसामान्यांची दैनंदिनी संकलित करतात. या सहजवृत्ती संकलनाच्या बरोबरच संजय जाधव यांचा कॅमेरा आपट्यांच्या सोबत अगदी सहज फिरताना आपल्याला दिसतो.

डोंबिवली फास्ट हा एका पॉईंटला अतिशयोक्तीपूर्ण घटनाक्रम आहे असं वाटतं. त्याचं कारण मला असं वाटतं की, त्यातल्या घटना मागच्या घटनांचा संदर्भ घेऊन पुढे सरकत नाहीत याउलट मागच्या घटनांपेक्षा अधिकतम काहीतरी सांगायला बघतात. पण ही अतिशयोक्तीपूर्णता सबंध कथानकात फार मोजक्या ठिकाणी दिसते. असं जरी असलं तरी त्या अतिशयोक्तीपणामुळे माधव आपटे सामान्यांच्या नजरेतले न राहता ‘लार्जर दॅन लाईफ’ कोणीतरी असामान्य कर्तृत्वाचे असे वाटायला लागतात. माधव आपटे हे पात्र पूर्वार्धात सामान्यांचं प्रतिनिधित्व करत असतील तर उत्तररार्धात सामान्यांच्या अव्याकाबाहेरच्या गोष्टी करताना आपण बघतो. याहीपलीकडे जाऊन जर चित्रपटात आपण पाहिलं तर लक्षात येतं की माधव आपटे या व्यक्तीला स्वतःची अशी काही मतं आहेत, त्यांची काही आयुष्यबद्दलची तत्व आहेत. त्यामुळे कथेत असणारा अतिशयोक्तीपणा सांभाळला जातो.नीरज पांडे लिखित दिग्दर्शित अ वेनस्डे (२००८) या चित्रपटात एका सामान्य कारकुनाने देशाच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेला वेठीस धरलं होतं. पण डोंबिवली फास्ट मध्ये या सामान्य माणसाच्या संघर्षाला कौटुंबिक जबाबदारीची किनार लाभलेली आहे. अ वेनस्डे आणि डोंबिवली फास्ट हे एका विषयावरचे भिन्न दृष्टिकोन ठरावेत तसे आहेत. अ वेनस्डे मध्ये ‘कॉमन मॅन’चं ‘अनकॉमन’ होणं माधव आपटेंच्या व्यक्तिरेखेसारखं भडक नसून अप्रत्यक्षरित्या आपली व्यथा मांडणारं असं आहे. त्यामुळे हे दोन चित्रपट म्हणजे एकमेकांसोबत असणाऱ्या समांतर रेषाच ठरतात. अखेरीस, प्रत्येक चित्रपट हा एखाद्याच्या ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ ने आपण पाहत असतो किंबहुना तसा आपल्याला दाखवला जातो. डोंबिवली फास्ट मध्ये दिसणारा सामान्य माणसाचा संघर्ष, त्याबरोबरीला असणारं संजय पवार लिखित स्वगत खरोखरच भिडणारं आहे. परंतु, चित्रपटाचा आवाका लक्षात घेता चित्रपटांमध्ये सामान्यांच्या मूलभूत गरजांवर लक्ष्य वेधता आलं असतं का , असा प्रश्न सतत मनात घोळत राहतो.

लेखक: अमेय सरदेशमुख


Copyright ©2019 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

One thought on “डोंबिवली फास्ट: ‘कॉमन मॅन’चा ‘अनकॉमन’ रस्ता

Add yours

  1. खूप छान लिहिलंय 👌
    चित्रपटाच्या कथेवर उत्तम भाष्य केलं आहे.तसेच editing आणि camera सांभाळणाऱ्या तंत्रज्ञांचा विचार केलेला दिसला.
    असंच सर्वांगीण लिहीत रहा.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: